लुईझियाना (इंग्लिश: Louisiana; फ्रेंच: État de Louisiane;
उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले लुईझियाना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३१वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २५व्या क्रमांकाचे राज्य आहे.
लुईझियानाच्या दक्षिणेला मेक्सिकोचे आखात, पश्चिमेला टेक्सास, उत्तरेला आर्कान्सा तर पूर्वेला मिसिसिपी ही राज्ये आहेत. बॅटन रूज ही लुईझियानाची राजधानी तर न्यू ऑर्लिन्स हे सर्वात मोठे शहर आहे. मिसिसिपी ही अमेरिकेमधील सर्वात मोठी नदी राज्याच्या मधून वाहते. राज्याचा दक्षिणेकडील भाग दलदलीच्या स्वरूपाचा आहे.
मासेमारी व शेती हे दोन येथील सर्वात मोठे उद्योग आहेत. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत लुईझियानाचा देशात ४१वा क्रमांक लागतो. येथील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणाऱ्या जलमार्गांमुळे सागरि वाहतूकीचे लुईझियाना हे अमेरिकेमधील सर्वात मोठे केंद्र आहे. मिसिसिपी नदीवर बांधलेले दक्षिण लुईझियाना बंदर हे पश्चिम गोलार्धातील सर्वात मोठे बंदर आहे.
अमेरिकन संघात सामील होण्यापूर्वी लुईझियाना ही एक फ्रेंच वसाहत होती. त्यामुळे येथील संस्कृतीवर फ्रेंच पगडा जाणवतो. आज्च्या घडीला लुईझियाना राज्यातील ३२.१ टक्के रहिवासी आफ्रिकन अमेरिकन वंशाचे आहेत. बॉबी जिंदाल हे भारतीय वंशाचे राजकारणी लुईझियानाच्या राज्यपाल पदावर आहेत.